तुझसे मिलकर…
चंद कलियां निशात की चुनकर
मुद्दतों महवे यास रहता हूं
तेरा मिलना खुशी की बात सही
तुझसे मिलकर उदास रहता हूं!
साहिर
असंच काहीतरी!
सज़ा चाहता हूं…
जसा वेळ मिळेल तसं, आमचे काही जुने दिवस इथे लिहावे म्हणतोय, पाहू वेळ मिळेल तसं!
आज फक्त एक पान:
दि.२१/०६/२००६ बुधवार १२:३५
उत्तर गोलार्धातला सर्वात लांब दिवस,व्यक्तीपरत्वे कमीअधिक मोठा असू शकतो. माझ्यासाठी खरंच खूप दीर्घ आहे. आतापर्यंत जेवणादि क्रियांमध्ये वेळ निघून गेला. यापुढचा दिवस कंटाळवाणा असणार आहे.
परवीन शाकिर म्हणाली होते-
रात का शायद एक बजा है,
सोता होगा मेरा चांद!
मी म्हणतो-
दिन का शायद एक बजा है,
क्लास में बैठा होगा चांद!
और क्या? १२:३५
[भरी बज़्म में राज़ की बात कह दी
बडा बेअदब हूं, सज़ा चाहता हूं...
(इक़बाल)]
लोग मजबूर हैं…
माझे मामा… अंगात लिडरकी,रक्तात RSS, डोक्यावर काँग्रेसची टोपी!
कधी नव्हे ते हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आले. मी on duty!
OPD बाहेर आलो.मामांसमोर गेलो.
“कसं काय सुरू आय?”
“मजेत आहे.”
“खोलीवर कोण हाय आता?”
एक क्षण वाटलं लपवावं, कुणीच नाही असं सांगावं.पण तोंडातून निघालं-
“ती आहे.”
“ती कोण?”
“तीच!”
मामा लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहतायत.मीही डोळ्यांकडेच पाहतोय.
मामा थंड आवाजात-
“लक्षात ठिव,तुये हाल कुत्रंबी खानार नाई.”
मी चूप.
“तुले वाटीन तसं कर. वाटीन तं बौद्ध धर्मात जाय. आमचं काई म्हननं नाई.पन लक्षात ठिव, तुये हाल कुत्रंबी खानार नाई.”
“ठीक आहे.”
“ठीकाय मंग”
मामा गेले. मी पुन्हा आपल्या OPDत जाऊन बसलो.
लोग मजबूर हैं पत्थर तो उछालेंगे ज़रूर,
क्यों न शीशों से कहा जाये वो टूटा न करें
जो ज़माने की हवाओं से बचाते है चराग़
“पियू, मी खूप वाईट माणूस आहे नं?”
“अहं”
“खरंच मी वाईट आहे”
“कोण म्हणतं?”
“सगळेच तर म्हणतात,यानं कुणाचाच विचार नाही केला. स्वतःचंच पहिलं”
“कोण म्हणतं सांगा तर?”
“सगळेच म्हणतात!”
“आणा बरं त्यांना माझ्याकडे,सांगते त्यांना. माझं शहाणं बाळ! चला झोपा मुकाट्यानं!”
आणि मग रात्री मला झोप लागल्यावर एकटंच रडत बसणारं माझं छोट्टंसं बाळ!
“क्या ख़बर है उनको के दामन भी भडक उठते हैं
जो ज़माने की हवाओं से बचाते है चराग़”
माझी लाडकी पियू!
बात कुफ़्र की…
बादल की शोख़ सुराही से
घूंट चांदनी पी है हम ने
बात कुफ़्र की की है हम ने…
-अमृता प्रीतम
आम्ही लग्न केलंय.
Zindagi,Mere Ghar aana…
बरेच दिवस झालेत तुमच्याशी गप्पा मारायला यायला वेळच मिळाला नाही.पण जगणं काही थांबत नसतं.थांबूही नये.
माझं काय,सगळं छान चाललंय! ती आहे, मी आहे आणि हे जग आहे.कधी सरळ चालणारं,कधी वाटेत आडवं येणारं!
कधी वाटतं हे सगळं routine होत चाललं आहे तरीही तिच्यासाठी मनाची तळमळ थांबवता येत नाही.
मला काहीच सांगायचं नाही.फक्त I love her toooo much but not more than she does! हे आजही खरंच आहे,कदाचित जगाच्या अंतापर्यंत हेच एक सत्य टिकून राहील!
कुठवर?
सगळं किती मस्त वाटते नाही? परीसोबत असायचं,फक्त तिच्यासोबत असायचं बस्स!
आता लपवण्यासारखंतसं काही राहिलं नाही.एक दिवस हिम्मत करून माझ्या सर्व डायऱ्या तिच्या हाती ठेवून दिल्या होत्या.तिनं कादंबरी सारख्या वाचल्या अन् ‘नाही’ न म्हणता निघून गेली.
मग आणखी जवळ यायला लागलो. कधी कधी खूप भिती वाटते हे सर्व शेवटाला नेण्याइतकी शक्ती आहे का आपल्यात? आंतरजातीय प्रेमविवाह वगैरे..!
मग कधी वाटतं
वो अफ़साना जिसे तक़मील तक लाना हो नामुमकीन
उसे एक ख़ूबसूरत मोड देकर छोडना अच्छा…
अन् तरीही परीचा जेव्हा विचार करतो तेव्हा, I know she loves me too much. At least,more than that I do! हे सगळं खूप कठीण होऊन बसलंय. याला शेवटापर्यंत न्यायचंय.मला माहित आहे she is best suited to me in the in world.
कधी म्हणते,”इतके दिवस झाले तुमच्यासोबत आहे.तुम्हाला इतकं तर ओळखतेच नं?” मला काय हवं काय नको; प्रत्येक गोष्ट माझ्याइतकिच तिलाही समजते. कधीकधी मी एखाद्या गोष्टीसाठी अडतो,मला कळतही नाही मी कशासाठी अडलो तर ती म्हणते- ९ डिसेंबर! मग माझ्या लक्षात येतं, मी हातात पेन घेऊन कधीपासून तारखेचा विचार करतोय.
आणि कधी म्हणते, “नंतर त्रास झाल्यापेक्षा आता झालेला बरा! ” अगदी मनापासून म्हणते. कारण तिलाही भविष्य वाचता येतं. तरीही तो नंतरचा त्रास आजवर ओढवून घेऊ शकत नाही.
ती असं काही बोलते अन् मग मी अगदी गप्प होऊन जातो. मग म्हणते,
“एक गोष्ट सांगू? तुम्ही असे नाराज़ नाराज़ चांगले नाही वाटत.”
“मग कसा चांगला वाटतो?”
या प्रश्नाचं उत्तर शब्दात कधीच नसतं तिच्याकडे अन् कधी आवश्यकताही वाटत नाही त्याची!
माझ्या सगळ्या असण्याला व्यापून असणारी परी! एखाद्या दिवशी माझ्या हातात हात देऊन घरी येईल अन् “वहिनी,नाव घ्या” म्हणत घराच्या दारात मुसळ लाऊन अडवायलाही कुणीच असणार नाही. कदाचित आम्ही येऊ, घराचं कुलुपही आम्हालाच उघडावं लागेल.
मी असं काही बोललो तर ती म्हणते, “किती विचार करता नं तुम्ही?” मग पुन्हा तीच म्हणते, “पण विचार करणं थांबवताही येत नाही नं!”
अशी माझी परी! येडी, मॅड पऱी! अन् मीही काही कमी नाही…. जन्मजात मुर्ख! बस्स!
आपलं घर
तिचं कॉलेज संपलं तेव्हा असं वाटलं होतं आता संपलं सर्व ! पण त्यानंतर ही नवी सुरूवात! हेसुद्धा खूपच छान दिवस आहेत.
तिच्या सोबत चालत असतो- खूप खूप दूर चालत असतो, पण परत जाणं अगदीच जीवावर येतं. मग ती किंवा मी कुणीतरी म्हणतं- चला, आपल्याला काही आपल्या घरी नाही जायचं, आपापल्या घरी जायचंय. बाय म्हणा !अन् बाय म्हणणं खूपच कठीण जातं तरीही परत यायचं तर असतंच !
आज तिला म्हणालो- “आपल्या घरी चलशील नं?”
“तुम्ही न्याल नं ?”
“हं !”
“मग येईल !”
पुन्हा म्हणाली, स्वतःशीच- “आपलं घर…आपण..!”
“आणि माझे आईबाबा”
“ते आपणमध्येच आलेत नं!”
ती इतकी छान आहे नं, सत्य शिव आणि म्हणून सुंदर ! म्हणून तर ती परी आहे.
परी आणि इतर..
आज संध्याकाळी परीचा फोन आला अन् वेळ कसा उडून गेला ते कळलंच नाही.कित्ती कित्ती विषय बोलण्याला !
अन् दुस-याच मिनिटाला ताईचा फोन आला. अभ्यास कसा सुरू आहे, जेवण वगैरे नीट करतोस की नाही, तब्बेत कशी आहे? बस्स यापुढे काहीच नाही.माझ्या जवळच्या माणसांजवळचे विषयही किती मर्यादित असतात.
की परीइतक्या जवळ मला कुणीच नाही?
आज फिर दिल को…
सात दिवस झालेत साधं दर्शनही नाही. दिवस तर जातातच पण जरा वातावरणात जरा ओलावा आला असता तर बरं वाटलं असतं. आत तर ओलावा असतोच, रक्त दिवसभर अंगातून वाहत असतं पण हाच ओलावा बाहेरही दिसला असता तर? बाहेरचं वातावरण अजुनही उन्हाळ्यासारखंच रुक्ष आहे.
आज फिर दिल ने एक तमन्ना की
आज फिर दिलको मैंने समझाया